जातनिहाय जनगणनेसाठी आता दिल्लीत धडकणार ओबीसी बांधव

23 मार्चला देशव्यापी आंदोलन

गडचिरोली : अनुसूचित जाती, जमातीबरोबरच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केले होते. मात्र यासंदर्भात जनगणना आयुक्तांनी 22 जानेवारीला राजपत्र जारी करताना जनगणनेसंबंधी 33 प्रश्नांची सूची जाहीर केली असून त्यात बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख आहे. मात्र ओबीसींचा उल्लेख करणे टाळण्यात आले. त्यामुळे ओबीसींची जातीनिहाय जनगणना होण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

यावर केंद्र सरकार कोणतेही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगाना /आंध्रप्रदेश आणि ओबीसी महासभेसह अन्य संघटनांच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर येणाऱ्या 23 मार्चला दुपारी 2 ते 5 या कालावधीत ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसह, युजीसी बिल 2026 लागू करावे, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, क्रिमिलेअयरची मर्यादा 13 सप्टेंबर 2017 पासून वाढली नाही, ती वाढवून 20 लाख करण्यात यावी आणि केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे.

केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी जातीनिहाय जनगणना करण्याचा कॅबिनेट निर्णय घेतला. ऑक्टोबर 2026 पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणि त्यानंतर उर्वरित भागात मार्च 2027 पासून जनगणना सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण जनगणना आयुक्तांनी एक अधिसूचना काढत राजपत्र जारी केले. 22 जानेवारीला जनगणना करण्यासाठी 33 प्रश्नांची सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट केल्या. 12 व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख आहे तर इतरांसाठी अन्य शब्दाचा प्रयोग केला आहे. ओबीसींचा स्पष्ट उल्लेख मात्र कुठेही नाही.

ओबीसींना हुलकावणी का?

मागास ठरविण्याच्या निकषात त्या जातीतील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती महत्त्वाचा घटक ठरत असते. पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार असून त्यात केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धर्म याचीच नोंद केली जाणार आहे. ओबीसी हा सुद्धा मागास प्रवर्ग असताना त्याची नोंद का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात केंद्र शासनाला जागे करण्यासाठी या आंदोलनात ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, डॉ.अशोक जीवतोडे, कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, शरद वानखेडे, सुभाष घाटे, डॉ. प्रकाश भागरथ, दिनेश चोखारे, रत्नमाला पिसे, महिला अध्यक्ष ज्योती ढोकणे,बीसी वेल्फेअर असोसिएशन तेलंगानाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजुला, आंध्रप्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा, ओबीसी महासभेचे विनय कुमार, धर्मेंद्र कुशवाह यांनी केले आहे.