अपघातानंतर संतप्त नागिकांनी कुनघाड्यात केला चक्काजाम

पाच तास वाहतूक होती ठप्प

चामोर्शी : गडचिरोली ते चाोर्शी मार्गावरील कुरघाडा रै. गावाजवळ सलग झालेल्या दुसऱ्या अपघातानंतर नागिकांनी महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन केले. अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांच्या मागणीसाठी जवळपास 5 तास हे आंदोलन चालले. या आंदोलनस्थळी आ.डॅा.मिलिंद नरोटे, तहसीलदार प्रशांत घोरुडे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांची समजूत काढली. अखेर शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत भेट घालून देण्याचे ठरल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शीवरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधाव कारने एका दुचाकी वाहनाला गुरूवारी धडक दिल्याने कुरघाड्यातील अतुल कोसमशिले हे गंभीर जखमी झाले, तर सुधाकर भांडेकर हे किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे या धडकेनंतर कारचालक न थांबता सुसाट वेगाने निघून गेला. त्यापूर्वी एका ट्र्क अपघातात एकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवारी मुख्य मार्गावर ठाण मांडून आंदोलन सुरू केले.

अपघातातील जखमींना आर्थिक मदत करावी, बस थांब्यावर सीसीटीव्ही बसवावेत, जड वाहतुकीला नियंत्रित करावे यासह इतर मागण्या गावकऱ्यांनी लावून धरल्या होत्या. बराच वेळ वाहतूक खोळंबल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात सरपंच अलका धोडरे, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी पं.स.सभापती आनंद भांडेकर, माजी जि.प.सदस्य पितांबर वासेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, तालुका सचिव दीपक भांडेकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.