गडचिरोली : शहरापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुडझा गावात काही दिवसांपूर्वी बीएसएनएल कंपनीने मोबाईल कव्हरेजसाठी टॅावर उभे केले. पण प्रत्यक्षात गावातील नागरिकांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. कारण मोबाईलधारकांना अजूनही कव्हरेजची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे लागलेला टॅावर केवळ शोभेसाठी लावला का? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
संपर्काचे माध्यम म्हणून आता मोबाईल फोनचा वापर सर्वसामान्य नागरिकांनाही आवश्यक वाटू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक घरी किमान एकतरी मोबाईल फोन बाळगला जात आहे. ग्रामीण भागात बीएसएनएल या सरकारी मोबाईल कंपनीचे ग्राहक सर्वाधिक आहेत. प्रत्येक गाव मोबाईल संपर्कात असावे यासाठी बीएसएनएलने अनेक ठिकाणी नवीन टॅावर मंजूर केले आहेत. असाच एक टॅावर मुडझा गावातही लागला आहे. मात्र तो व्यवस्थित काम करत नसल्यामुळे नागरिकांना कॅाल न लागणे, आवाज न येणे, मध्येच कॅाल ड्रॅाप होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात बीएसएनएल कार्यालयाकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र सेवेत सुधारणा झालेली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बीएसएनएल कंपनीच्या सेवेतील त्रुटी दूर कराव्या अशी मागणी केली जात आहे.