गडचिरोली : शहरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून निर्माण झालेला एचपी गॅस सिलीडरचा तुटवडा गंभीर स्वरूप धारण करत आहे. दररोज सकाळी एजन्सीच्या कार्यालयासमोर गॅसचा हंडा घेऊन लाईन लावावी लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेक कुटुंबांची यामुळे तारांबळ उडत आहे.
गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारे सिलीडर ब्लॅकमध्ये विक्री केल्या जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
सिलेंडर मिळत नसल्याने महिलांचे हाल
गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीसमोर महिलांची मोठी रांग सकाळपासून लागत आहे. अनेक वेळा एजन्सीमध्ये जाऊनही सिलिंडर उपलब्ध नसल्याचे सांगून ग्राहकांना परत पाठवले जात असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. घरात स्वयंपाकाच्या वस्तू असतानाही गॅस नसल्याने आम्हाला भुकेल्या पोटी राहावे लागत आहे,” अशी भावना एका महिला ग्राहकाने व्यक्त केली.
पुरवठा कमी असल्याचे कारण
नागरिकांच्या मते, उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना दिले जाणारे सबसिडीचे सिलेंडर गुपचूपपणे ब्लॅकमध्ये विकले जात आहेत. सिलेंडरचा दर साधारणपेक्षा अधिक आकारला जात असल्याचीही माहिती नागरिकांनी दिली आहे. तुटवड्याबाबत एजन्सींकडे विचारणा केल्यावर “पुरवठा कमी आहे”, “वाहतूक अडचणींमुळे गॅस येऊ शकला नाही” अशी कारणे देण्यात येत आहेत. मात्र सलग 10 ते 12 दिवस पुरवठा खंडित राहणे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी तपास करावा, अशी मागणी केली आहे.
































