गडचिरोली : शहरात होऊ घातलेल्या विमानतळासाठी जुन्या सर्व्हेनुसार शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील जागा सोडून मुरखळा व लगतच्या गावातील सुपिक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी मुरखळा येथे सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.
प्रशासनाने विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या.नागपूर यांना सदर शेतजमिनी देण्यासाठी मुरखळा, कनेरी, पुलखल, नवेगाव, मुडझा आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस जारी केली आहे. परंतू संबंधित शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायतींनीही विरोधात्मक ठराव दिला असताना सरकारी यंत्रणेने ग्रामपंचायतींचा ठराव आणि जनभावना धुडकावून लावल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना भूमिहीन न करता जुन्या सर्व्हेक्षणानुसार निवडलेल्या जागेवरच हे विमानतळ उभारावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
शरद ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मुरखळा येथील सर्व्हे नं.324/2 मध्ये सोमवार (दि.28)पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.