गडचिरोली : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या गडचिरोली पोस्ट ऑफिसमधील रेल्वे तिकीट बुकिंगचे काऊंटर अखेर आज, दि.24 पासून पुन्हा सुरू झाले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे काऊंटर अनेक दिवसांपासून बंद होते. खासदार डॅा.एन.डी.किरसान यांनी याबाबत रेल्वेचे जनरल मॅनेजर सिंग यांना सूचना केल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत तांत्रिक अडचण दूर केली.
गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नसले तरी लांब प्रवासावर रेल्वेने जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने गडचिरोलीच्या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा दिली आहे. मात्र तिकीट काढण्यासाठी प्रिंटरमध्ये बिघाड आल्याने आणि दुसरे कोणतेही प्रिंटर जुळत नसल्यामुळे शेवटी हे काऊंटरच बंद ठेवले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग किंवा रद्द करण्यासाठी वडसा रेल्वे स्थानकावर जावे लागत होते.
प्रवाशांची ही अडचण खा.किरसान यांनी रेल्वे प्रशासनाकडे मांडली. त्यामुळे गडचिरोली पोस्ट ऑफिसमधील रेल्वे बुकिंग काऊंटरसाठी नवीन प्रिंटर पाठवण्यात आले. शनिवारपासून (दि.24) तिकीट बुकिंग काऊंटर पुन्हा सुरू झाल्याचे पोस्ट मास्तर करडे यांनी सांगितले.