देसाईगंज : शहरातील रेल्वेच्या बोगद्यात (अंडरपास) पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नगर परिषद प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मोठा खर्च करून काम केले. त्यासाठी 15 दिवस बोगद्यातून होणारी वाहतूकही बंद ठेवली होती. मात्र तरीही बोगद्यात पाणी साचून परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्यामुळे त्यावर केलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रेल्वेमार्गामुळे देसाईगंज शहर दोन भागात विभागल्या गेले आहे. रेल्वे स्टेशनजवळ बनविण्यात आलेला अंडरपास हा नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सुरक्षित आणि शॅार्टकट मार्ग आहे. मात्र सततच्या पावसामुळे त्या बोगद्यात पाणी साचत असल्याने त्यातून वाहन टाकणे धोक्यात ठरत आहे. अनेकांची वाहने या पाण्यात बंद पडून फजिती झाली आहे.
या परिस्थितीवर काँग्रेसचे युवा नेते पिंकू बावणे यांनी संताप व्यक्त करत ही नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आहे, असा आरोप करत नगर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची भावना व्यक्त केली. शिवाय या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.