आजपासून सुरू होणार अनखोडा केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी

हमीभावाचा लाभ घ्या- गण्यारपवार

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे भारतीय कापूस निगम (सीसीआय) कार्यालय अकोला यांच्याकडून शासकीय आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी केंद्र मंजूर झाले. वर्ष 2024-25 करिता मंजूर झालेल्या या केंद्रावर कापूस विक्रीकरिता सीसीआयच्या पोर्टलवर आॅनलाईन नोंदणीला 1 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आस्था जिनिंग अॅन्ड प्रेसिंग इंडस्ट्रीज अनखोडा (आष्टी) येथे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन म.रा.सहकारी पणन महासंघ मुंबईचे संचालक अतुल गण्यारपवार तथा चामोर्शी कृउबा समितीचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक यांनी केले आहे.

पोर्टलवरील आॅनलाईन नोंदणीसाठी कापूस पिकाची नोंद असलेला सातबारा व नमुना 8 अ, आधार-मोबाईल लिंक्ड असलेले बँकेचे पासबुक, आधार कार्डची झेरॅाक्स, मोबाईल नंबर (आधार लिंक असलेला), साताबारावर अनेक नावे असल्यास इतरांचे संमतीपत्र, तसेच पोस्ट खाते असल्यास त्याला सेव्हिंग खात्यात कन्वर्ट करणे आवश्यक आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कापूस विक्रेत्यांनी वरीलप्रमाणे कागदपत्रांसह भारतीय कापूस निगमच्या आस्था जिनिंग या केंद्रावर नोंदणीसाठी यावे असे आवाहन गण्यारपवार, मल्लीक व चामोर्शी बाजार समितीचे प्र.सचिव निलेश पिंपळकर यांनी केले आहे.