एटापल्ली : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या अतिसंवेदनशील पिपली बुर्गी, बेलमागड, गणपहाडी, हेटळकसा, मोहुर्ली, कुद्री आणि नागुलवाडी या अतिदुर्गम गावांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या समस्येबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरण आणि तहसील कार्यालयात निवेदन सादर करून ही समस्या दूर करण्याची मागणी केली.

वीजपुरवठा अखंडित नसणे, जुनाट वीज खांब व तारा दुरुस्त करणे, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणे आणि नवीन विद्युत सहाय्यक नियुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, महिन्यातून एखाद्याच दिवशी वीजपुरवठा सुरळीत होत असतो. उर्वरित दिवस वीज नसतानाही संपूर्ण वीजबिल आकारले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः मौजा पिपली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वीज नसल्याने रुग्णांना उपचारात अडचणी येत आहेत. गरोदर महिलांना, लहान मुलांना तसेच सर्पदंशासारख्या आपत्कालीन प्रसंगात आरोग्यसेवा विस्कळीत होत आहे. वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महावितरणकडे यासंदर्भात मागील 5 महिन्यांपासून तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या असताना कोणतीच ठोस पावले न उचलल्याने संतप्त नागरिकांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता जि.ह. वाघमारे, कनिष्ठ अभियंता मडावी, तांत्रिक अभियंता दिनेश थेरे, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्या कार्यालयात धडक दिली. सदर मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुकाध्यक्ष संभाजी हिचामी, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, कार्यकर्ते लक्ष्मण नरोटे, गिरीश नरोटे, माजी सरपंच नामदेव लेकामी, गाव पाटील सैनू लेकामी, सुरेश लेकामी, माधव लेकामी, बुक्कू पुंगाटी, बिनराम एक्का, दिलीप नरोटे, सन्नू लेकामी, सुखदेव बक्कपण, दिलबोर तिरकी, दिलीप लेकामी, अंकुश पदा, घिसू कातवो, नरेश एक्का, दिलीप नरोटे, संजय नरोटे, प्रकाश पुंगाटी, कोमठी लेकामी, रामसू नरोटे, भिवा पदा, मनोज लेकामी, पेका लेकामी, मधुकर मट्टामी, विजय लेकामी, संजू पदा, सचिन लेकामी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

































