एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड ते गट्टा या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. याबाबत माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर करून रस्त्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे आ.आत्राम यांनी हे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या.
कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेत सुरजागड ते गट्टा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सुरजगड ते नेडेरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कामाची पाहणी करताना बेबी लेकामी, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, गिरिश नरोटे, उमेश हिचामी, जरेवाडा येथील उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होऊन विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
































