गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागात मूलभूत सुविधा पुरवून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृती करणे आणि लोकांचे दैनंदिन जगणे सुकर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. तसेच अहेरी तालुक्यातील दोन निष्पाप मुलांना वैदूच्या उपचारानंतर जीव गमवावा लागला आणि रस्ते व साधनांअभावी मुलांचे मृतदेह खांद्यावर वाहून आणावे लागले. येर्रागड्डा येथील त्या मृत मुलांच्या आई-वडीलांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली.
पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना अजूनही मूलभूत सोयी सुविधा नसल्याने त्यांचे दैनंदिन जीवन अतिशय खडतर आणि यातनामय झाले आहे. विशेषतः पावसाच्या दिवसात त्यांना रस्ते व पुलाअभावी दवाखान्यात पोहोचण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा लोकांना जीवसुद्धा गमवावा लागतो. अशा घटना मागील अनेक वर्षांपासून घडत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊनसुद्धा जिल्ह्यातील नागरिकांना अशा यातना भोगाव्या लागत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हे सर्व नागरिकांच्या मानवी व मुलभूत अधिकारांचे हनन आहे, तरीही सरकारचे व प्रशासनाचे त्याकडे फारसे गंभीरपणे लक्ष नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
आदिवासी विकासावर अब्जो रुपये खर्च होऊनही आज अशी परिस्थिती असल्याने हा निधी कुठे गेला, असा प्रश्नही उपस्थित उपस्थित करण्यात आला. दुर्गम भागातील रस्ते व पुलांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, या भागात बारमाही वाहतुकीची साधने उपलब्ध करावी, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर, अन्य स्टाफ, औषधीसाठा व वाहनांची व्यवस्था करावी, दुर्गम भागातील लोकांमध्ये अजूनही अंधश्रद्धा असल्याने त्यांच्या जागृतीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात यावी, वैदूंचे काम करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच त्यांना आरोग्य व अंधश्रद्धांबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, सर्व शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, न राहणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा मागण्याही यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केल्या.
निवेदन देताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, सचिव राजन बोरकर, गडचिरोली विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जेष्ठ कार्यकर्ते दादाजी धाकडे, जिल्हा महिला उपाध्यक्ष कल्पना रामटेके, सहसचिव कविता वैद्य उपस्थित होते.