दुर्गम गावे पक्क्या रस्त्यांनी जोडणार, ना.धर्मरावबाबा आत्राम यांची माहिती

भामरागड तालुक्याची घेतली आढावा बैठक

भामरागड : महायुती सरकारकडून भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून अहेरी विधानसभेसह जिल्ह्यातील सर्व गावे मजबूत व पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. शनिवारी भामरागड तालुक्यातील शासकीय कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते.

या आढावा सभेत प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, नगराध्यक्ष रामबाई महाका, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार तसेच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आणखी एका योजनेची भर पडली असून “भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास योजना” राबविण्यात येत आहे. तब्बल ५ हजार कोटींच्या निधीतून व्हीलेज टू व्हीलेज कनेक्ट करण्यात येणार आहे. या योजनेचा आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर महायुती सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी ना.धर्मरावबाबा यांनी केले.

तहसील कार्यालयात झालेल्या आढावा सभेत प्रामुख्याने आरोग्य विभागाकडून रुग्णांची माहिती घेऊन रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुपोषण कमी करण्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन करणे, रस्ते बांधकामात दर्जेदार करणे, सर्वांना घरकुल मिळेल असे योग्य नियोजन करणे, पाणी पुरवठा विभागाच्या कामात सुधारणा करणे असे महत्वाचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत तालुक्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भामरागड येथे प्रवेश होताच आदिवासी बांधवांनी रेला नृत्याने ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत केले. तसेच त्रिवेणी व्यापारी संघटनेकडून त्यांच्यासह, युवा नेते ऋतुराज हलगेकर, हर्षवर्धनबाबा आत्राम यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.