गडचिरोली : शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना स्वतःच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गडचिरोली तालुक्यात सुरू झाली आहे. महसूल विभागाच्या 8 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार ही सुविधा पुरविण्यात येत असून यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले आहे.
घरकुल लाभार्थ्यांसाठी ‘झिरो रॉयल्टी’ सुविधा
घरकुल योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी कमाल 5 ब्रासपर्यंत वाळू विनामुल्य (शून्य रॉयल्टी) उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी लाभार्थ्यांना महाखनिज पोर्टलवर ऑनलाईन पासेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
स्थानिक वापरासाठी वाळूची उपलब्धता
ज्या स्थानिक नागरिकांना स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी वाळू हवी आहे, त्यांना शासनाकडे स्वामीत्वधन (रॉयल्टी), जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व इतर आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर वाळू उपलब्ध करून दिली जाईल. बांधकामाचा आराखडा विचारात घेऊन आवश्यक परिमाणात वाळूचे पासेस ऑनलाईन दिले जातील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
वाळू मागणीसाठी अर्जदारांनी ‘महाखनिज’ (Maha-Khanij) या संगणक प्रणालीवर खालील कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
* मालमत्ता पत्रक किंवा गट नंबरचा उतारा.
* आधार कार्ड.
* बांधकामाचा मंजूर आराखडा.
* ग्रामपंचायत क्षेत्रासाठी : ग्रामसेवकाचा वाळू मागणी प्रमाणीकरण दाखला.
* वाळूचा वापर फक्त स्वतःच्या वैयक्तिक कामासाठीच करणार असल्याचे स्वयंघोषणापत्र.
आतापर्यंतचे वाटप व सद्यस्थिती
गडचिरोली तालुक्यात सन 2025-26 या वर्षासाठी एकूण 1,223 घरकुल लाभार्थ्यांकरिता 6,115 ब्रास वाळू देण्याचे उद्दिष्ट आहे.
* आतापर्यंतचे वितरण : 820 लाभार्थ्यांना 1,641 ब्रास वाळूचे वाटप पूर्ण झाले आहे.
* पुढील नियोजन : उर्वरित 4,474 ब्रास वाळूसाठी रॉयल्टी पासची मागणी करण्यात आली असून, पास प्राप्त होताच सर्व पात्र लाभार्थ्यांना तत्काळ वाळू वाटप करण्यात येणार आहे.
“तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांनी आणि स्वतःचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून महाखनिज पोर्टलवर अर्ज करावा, जेणेकरून वेळेत वाळू उपलब्ध करून देता येईल.”
– सागर कांबळे,
तहसीलदार, गडचिरोली
































