गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात सुरू केल्या जाणाऱ्या नवीन झेंडेपार लोहखाण प्रकल्पाला सरपंच संघटनेने विरोध दर्शवला आहे. या खाणीला मंजुरी देताना ग्रामसभा, पेसा कायद्याचा विचार केला नाही, किंवा स्थानिक लोकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे झेंडपार खाण बंद न केल्यास सामूहिकरित्या राजीनामे देऊन आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात अनेक मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यात नमुद केल्यानुसार, कोरची तालुका हा अतिसंवेदनशील व मागास भाग म्हणून ओळखला जातो. हा तालुका पेसाअंतर्गत येत असून मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापलेला आहे. येथे घनदाट जंगलासह मोठमोठे डोंगर आहेत. अनेक वन्यप्राणी येथे आहेत. नैसर्गिकरित्या बनलेले हे जंगल मौल्यवान आहे. प्रस्तावित झेंडेपार खाणीमध्ये B1 श्रेणीचे लोह असून त्याचे एकूण क्षेत्र 46.38 हेक्टर आर आहे. शासनाने कंत्राटदारांना 30 वर्षाकरिता ती जागा दिलेली आहे. परंतु खाण सुरू करण्यासाठी गडचिरोलीत जनसुनावणी झाली त्यावेळी स्थानिक लोकांनी मोठ्या संख्येने हजर राहून प्रकल्पाला विरोध केला होता. जनसुनावणी स्थानिक पातळीवर घेण्यात यावी, अशीही मागणी झाली होती. परंतु सन 2023 ला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथेच जनसुनावणी ठेवण्यात आली. या जनसुनावणीला स्थानिक लोक हजर नसतानाही शासनाने प्रकल्पाला परवानगी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

कोरची तालुक्यात 90 टक्के लोक आदिवासी आहेत. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. आजपर्यंत आदिवासींनी या जंगलाची जोपासना केली आहे. कारण आदिवासी देवकामात, लग्नात, नवसात व इतर समारंभात नैसर्गिक जंगलातील वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडाचे लाकूड, पाणी इत्यादी लागणाऱ्या वस्तू आणून आपले कार्यक्रम पार पाडतात. झेंडेपार लोहप्रकल्प सुरू झाला तर नैसर्गिकरित्या वाढलेले जंगल नष्ट होईल. झाडे तोडल्याने वातावरणात बदल होऊन उष्णता वाढेल. त्यातून मानवी जीवाला आणि वन्यजीवांना धोका होऊ शकतो, अशी भिती सरपंच संघटनेने व्यक्त केली.
शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांचा विचार करून झेंडेपार लोहखाण बंद करावी, अन्यथा सरपंच संघटना सामूहिकरित्या राजीनामे देऊन चक्काजाम आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदन तहसीलदार प्रशांत गड्डम यांना देताना कोरची तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष धनीराम हिडामी, सचिव सुनील सयाम, महिला अध्यक्ष कुंती हुपुंडी, महिला सचिव छाया बोगा, उपाध्यक्ष ममता सहारे, उपाध्यक्ष सरील मडावी, सहसचिव मोहन कुमरे, सहसचिव कौशल्या काटेंगे, कोषाध्यक्ष चेतानंद किरसान यांच्यासह 21 सरपंच-उपसरपंच उपस्थित होते.