पोलीस भरतीसाठी येणाऱ्यांसाठी हक्काचा निवारा आणि भोजनही

राष्ट्रवादी यु.काँ.चा स्तुत्य उपक्रम

गडचिरोली : बेरोजगारीने पीडित गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो युवा वर्ग पोलीस भरतीची मैदानी चाचणी देण्यासाठी गडचिरोलीत दाखल होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) कडून हक्काचा निवारा आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत तीन पोलीस भरती आणि एका वनरक्षक भरतीनंतर सलग पाचव्या भरतीसाठी हा उपक्रम राबविला जात असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांना यातून मोठा दिलासा मिळत आहे.

यावर्षीच्या पोलीस भरतीसाठी 27 हजार उमेदवारांनी (युवक-युवती) अर्ज भरले आहेत. पहाटे 4 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर व्हावे लागत असल्याने दिलेल्या तारखेच्या एक किंवा दोन दिवस आधीच संबंधित उमेदवारांना गडचिरोलीत यावे लागते. ज्यांचे गडचिरोलीत कोणी आप्तेष्ट किंवा मित्र नाही त्यांना हॅाटेलमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र बेरोजगारीने पीडित उमेदवारांना हॅाटेलमध्ये राहण्याचा आणि जेवणाचा खर्च परवडत नाही. अशा उमेदवारांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि गडचिरोली नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांच्या पुढाकाराने, आणि माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, तनुश्री आत्राम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय चौकातील एका हॅाटेलच्या हॅालमध्ये उमेदवारांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जात आहे. दररोज दिडशेपेक्षा जास्त उमेदवार याचा लाभ घेत आहेत.

पोलीस भरतीसाठी आधी ग्रामीण भागातून येणारे अनेक उमेदवार फुटपाथवर झोपून रात्र काढत होते. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम सुरू आहे. भल्या पहाटे उमेदवारांना वेळेत पोलीस मुख्यालयी पोहोचणे सोपे जावे म्हणून यावर्षी जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावरच्या हॅाटेलमध्ये ही व्यवस्था केल्याचे लिलाधर भरडकर यांनी सांगितले.

या उपक्रमाला स्वप्नझेप करिअर अकॅडमीचे संचालक सुमेध चव्हाण आणि सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव यांचेही सहकार्य लाभ आहे. बाजुलाच असलेल्या सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्थेने अशाच पद्धतीने उमेदवारांची निवास व्यवस्था केली आहे. तिथे मुक्कामी येणाऱ्या उमेदवारांच्याही भोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे. शुक्रवारपासून महिला पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचण्या होणार आहेत. त्यांचीही व्यवस्था या ठिकाणी सुरळीतपणे केली जाणार असल्याचे, तसेच लेखी परीक्षेसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांसाठीही अशीच व्यवस्था करू, असेही भरडकर यांनी सांगितले.