गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत आपले नाव असल्याबाबत मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) तसेच तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन किंवा व्होटर हेल्पलाइन ॲप यावरून खात्री करावी. मतदार यादीत दुरुस्ती, वगळणी, मतदार ओळखपत्राबाबत विनंती अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतात. त्यासाठी 20 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मतदार नोंदणी करण्यासह मतदार यादीतील नाव, पत्ता आणि अन्य तपशील पडताळून, त्यात बदल सुधारणा करण्याची संधी नागरिकांना असणार आहे.
मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर
दिनांक 17 ऑगस्ट, 2024 (शनिवारी) आणि 18 ऑगस्ट 2024 (रविवारी) या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे ठेवली आहेत. युवा नवमतदार, दिव्यांग, महिला, तृतीयपंथी, देहव्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. कार्यक्रमाच्या कालावधीतील शनिवार आणि रविवार या दिवशी या शिबिरांचे आयोजन केले जाईल. या शिबिरांच्या माध्यमातून लक्षित घटकांना मतदार नोंदणीची संधी सुलभरित्या उपलब्ध करून दिली जाईल, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
मतदार नोंदणीसाठी घरोघरी जावून प्रोत्साहित करा
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी होणे आवश्यक असून यासाठी घरोघरी जावून नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आणि मतदार नोंदणीला गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक विजयलक्ष्मी बिदरी यांनी शुक्रवारी दिल्या. आयुक्त बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गुरूवारी व्हिडीओ कॅान्फरन्सिंने गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती सादर केली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, श्रीमती मानसी, आदित्य जिवने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.