सिकलसेलमुक्त गडचिरोलीसाठी 15 जानेवारीपासून विशेष तपासणी

'अरुणोदय' विशेष मोहीम राबविणार

प्रशिक्षण सत्राच्या समारोपप्रसंगी उपस्थित अधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी

​गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर प्रभावी प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याच्या उद्देशाने ‘अरुणोदय’ ही विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत ही विशेष मोहीम राबवून एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प प्रशासनाने केला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

​सिकलसेल हा एक अनुवंशिक रक्तविकार असून तो केवळ रक्ताची तपासणी केल्यावरच समजतो. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

​जिल्हा प्रशासनाचे आवाहन व मार्गदर्शन

​जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सिकलसेलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने ‘अरुणोदय’ मोहीम हे एक निर्णायक पाऊल आहे. गडचिरोलीतील दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाने आपली रक्त तपासणी करून घ्यावी. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून देणे सोपे होते, ज्यामुळे पुढील गंभीर गुंतागुंत टाळता येईल.

जि.प.चे ​मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, सिकलसेल आजार हा आनुवंशिक असल्याने तो माता-पित्याकडून मुलांकडे जातो. ही साखळी तोडण्यासाठी विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करणे अनिवार्य आहे. शालेय स्तरावरही आम्ही जनजागृती करत असून, शिक्षकांनी सिकलसेलबाधित मुलांची विशेष काळजी घ्यावी, त्यांना जड व्यायाम टाळण्यास सांगावे आणि आहार व पाण्याकडे लक्ष द्यावे.

​जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी तांत्रिक माहिती देताना स्पष्ट केले की, सिकलसेलचे वाहक आणि रुग्ण अशा दोन प्रकारांची माहिती दिली. वाहक व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी ते पुढील पिढीला हा आजार देऊ शकतात. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत समुपदेशन, सोल्युबिलिटी चाचणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी विशेषतः ताप, सांधेदुखी किंवा वारंवार कावीळ होत असल्यास त्वरित तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

​जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी उपचारांबाबत माहिती दिली. सिकलसेल रुग्णांनी घाबरून न जाता दररोज 10 ते 15 ग्लास पाणी प्यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्याव्यात. समतोल आहार, नियमित तपासणी आणि योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी सर्व सोयी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

​शासकीय लाभ व सवलती

सिकलसेल बाधित रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, एसटी बस प्रवासात सवलत आणि 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रतितास 20 मिनिटे वाढीव वेळ अशा विविध सवलती शासनस्तरावरून दिल्या जात आहेत.

​गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी आणि जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.