Home पब्लिक प्रॉब्लेम गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 विशेष दक्षता पथके नियुक्त

गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 विशेष दक्षता पथके नियुक्त

जास्त दर आकारल्यास कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, तसेच गॅसची अवैध साठवणूक, अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तालुकानिहाय 12 विशेष दक्षता व फिरती पथके नियुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि ग्राहकांना योग्य दरात गॅस उपलब्ध व्हावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्यामध्ये निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक व कनिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. ही पथके जिल्ह्यातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांचे वितरक तसेच इंडेन गॅससह सर्व एलपीजी एजन्सींची तपासणी करणार आहेत.

तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध साठा, व्यावसायिक कामासाठी गैरवापर किंवा ग्राहकांकडून विहित दरापेक्षा जास्त दर आकारणी आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 तसेच इतर प्रचलित कायद्यांनुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नियुक्त पथकांना केवळ तपासणी करून थांबायचे नसून, केलेल्या तपासणी व कारवाईचा दैनिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांचे नियंत्रण राहणार आहे.