गडचिरोली : कर्करोगावर वेळीच उपचार करता यावेत आणि रुग्णांचा जीव वाचविता यावा यासाठी कर्करोगाची तपासणीची सुविधा असणारे विशेष वाहन तयार करण्यात आले आहे. हे वाहन तुमच्या तालुका मुख्यालयापर्यंत येऊन संशयित रुग्णांची तपासणी करणार आहे.

या फिरत्या वाहनाचा दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून आतापर्यंत 1661 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात मुख कर्करोगाचे 48, स्तन कर्करोगाचे 12, गर्भाशयमुख कर्करोगाचे 22 संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांच्यावर पुढील तपासण्या करून तात्काळ औषधौपचार, तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले.
या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 30 एप्रिल 2025 पर्यंत कर्करोग तपासणी वाहन संपूर्ण जिल्यामध्ये फिरणार आहे. या वाहनामध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व मुखाचा कर्करोग इत्यादी तपासणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे 30 वर्षावरील जास्तीत जास्त लोकांनी या आपल्या तपासण्या करून कर्करोगमुक्त जीवन जगावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
फिरत्या कॅन्सर तपासणी व्हॅनने आतापर्यंत चामोर्शी, मुलचेरा आणि एटापल्ली येथे तपासणी केली आहे. आता हे वाहन दि.4 व 5 एप्रिलला भामरागडमध्ये, दि.7 व 8 ला अहेरी, दि.9 ते 11 सिरोंचा, दि.15 व 16 ला आरमोरी, दि.17 ते 19 दरम्यान देसाईगंज, दि.21 व 22 ला कुरखेडा, दि.23 व 24 ला कोरची, दि.25 व 26 ला धानोरा, आणि दि.28 ते 30 एप्रिलपर्यंत गडचिरोलीत संशयित रुग्णांची तपासणी करणार आहे.