गडचिरोली : गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या हद्दीत १० ठिकाणी गतिरोधक तयार करावे, अशी मागणी कारगिल चौक परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्याकडे केली. त्याबाबतचे पत्र काही जागरूक नागरिकांनी त्यांना दिले.
गडचिरोली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षात अनेकांचे अपघात होऊन काही लोकांना जीवही गमवावा लागला. अपघातग्रस्त झालेल्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात आहे. १ मे २०२३ ला कारगील चौकात एक शालेय आदिवासी विद्यार्थी ट्रकद्वारे चिरडला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू पावला. हा विद्यार्थी गडचिरोली शहरात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेड्यातून आला होता.
नागरिकांनी उदय धकाते यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी पिदूरकर यांना निवेदन देऊन शहरातील वाढते अपघात, त्यासाठी कारणीभूत असलेले अतिक्रमण आणि उपाय म्हणून गतिरोधक निर्माण करण्याबाबत चर्चा केली. या निवेदनाची नगर प्रशासनाने गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना पत्र देऊन गतीरोधक निर्माण करण्याचे सूचित केले असल्याची माहिती उदय धकाते यांनी दिली. गतीरोधक असणे गरजेचे असलेल्या ठिकाणांमध्ये चंद्रपुर – धानोरा महामार्गावरील कार्मेल शाळेकडे वळणाऱ्या रस्त्याजवळ, लांझेडा गावामध्ये जाणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाजवळील मार्गाजवळ, इंदिरा नगरकडे जाणाऱ्या वळण मार्गाजवळ, चंद्रपूर मार्गावरील कारगील स्मारकाजवळ, गडचिरोली-धानोरा महामार्गावरील बाबुराव चौकाजवळ, चंद्रपूर मार्गावरील बजाज शोरूम जवळ, आय.टी.आय. चौक येथे, इंदिरा गांधी चौकात चारही मुख्य मार्गावर, जिल्हा न्यायालयाजवळ आणि नगर भवनाजवळ असे १० ठिकाण नागरिकांनी सूचविले आहेत.
गडचिरोलीत १० ठिकाणी गतिरोधक निर्माण करा
कारगिल चौकातील नागरिकांचे नगर परिषदेला साकडे