
गडचिरोली : धानोरा तालुक्यातल्या दुर्गम भागातील आंबेझरीसह परिसरातील 15 गावांमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाने बससेवेचा शुभारंभ केला. गावात पहिल्यांदा एसटी बस आल्याचा आनंद गावकऱ्यांनी नाचगाणी करून साजरा केला.
जिल्हा मुख्यालयापासून 100 किलोमीटरवर असलेल्या आंबेझरीसह एकूण 15 गावांमध्ये ही बस जाणार आहे. आतापर्यंत गावात बस येण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावांनी बस पहिली नव्हती. मात्र आता रस्ता, पूल झाल्यामुळे बससेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. शुभारंभाला बस गावात आल्यानंतर पोलीस व गावकऱ्यांनी पूजाअर्चा करून बसचे स्वागत केले. गावात बस आल्याच्या आनंदात महिलांनी नाच-गाणीही सादर केली.
दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच उपक्रमाअंतर्गत दि.18 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने आंबेझरीपर्यंत बससेवा सुरु करण्यात आली. गडचिरोली-चातगाव- धानोरा-येरकड- मुरुमगाव-खेडेगाव- आंबेझरी-मंगेवाडा- जयसिंगटोला-मालेवाडा मार्गावर सुरु झालेल्या या बससेवेमुळे या भागातील 15 पेक्षा जास्त गावांमधील नागरिकांचे जीवनमान सुसह्य होणार आहे. तसेच त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे.
यापूर्वी 26 एप्रिल 2026 रोजी गडचिरोली ते मौजा कटेझरी अशी बससेवा गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस मुख्यालयापासून 100 कि.मी. आणि कटेझरी येथून 21 कि.मी.वर असलेल्या अतिदुर्गम आंबेझरी येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत वाजत गाजत बसचे स्वागत केले. शाळेतील मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि.अजय भोसले यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शनही केले.
507 मोबाईल टॅावर्सची उभारणी
सामान्य नागरिकांच्या दळणवळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरात आतापर्यंत 507 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली आहे. तसेच एकूण 420 कि.मी.लांबीच्या रस्त्याचे आणि 60 पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षभरातच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जा.) गर्देवाडा, वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) जगदीश पांडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेहारीचे प्रभारी अधिकारी पोउपनि.अजय भोसले व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.