शालेय बसफेऱ्या सुरू करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन

सुभाषनगर येथे रास्ता रोकोसह घोषणाबाजी

सुभाषनगर येथे धरणे देऊन रास्ता रोको करताना काँग्रेस पदाधिकारी व विद्यार्थी.

गडचिरोली : यावर्षीचे शैक्षणिक सत्र शुक्रवार दि.30 जूनपासून सुरू झाले. या सत्राच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने आलापल्ली-आष्टी मार्गाच्या दुरवस्थेमुळे बंद असलेल्या बसगाड्यांचा विषय मांडत विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केले. सुभाषनगर येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली.

जड वाहतुकीमुळे आष्टी-आलापल्ली महामार्गाची दुरावस्था झाली असल्याने सदर महामार्गवरील महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्त्यांना आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सायकलने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या काळात शिक्षणाची गंगा वाहात होती, पण भाजपच्या काळात विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत असल्याने गावकरी, विद्यार्थी आणि अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.

अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलीस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी आंदोलस्थळी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व सोमवारपासून नियमित बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ.नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष डॉ.निसार (पप्पू) हकीम, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रजाक पठाण, उपाध्यक्ष राघोबा गौरकर, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष मधुकर शेडमेक, किसान सेल तालुकाध्यक्ष नामदेव आत्राम, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हनिफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, बेबी कुत्तरमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.

सोमवारपासून बससेवा नियमित होणार
यासंदर्भात एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक सुकन्या सुतवणे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ४५ बसगाड्या पंढरपूर यात्रेसाठी गेल्याने काही मार्गावर बसफेऱ्या कमी कराव्या लागल्या. शुक्रवारी शाळेचा पहिलाच दिवस होता. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतरच मानव विकासच्या स्कूल बसेस सुरू होतात. सोमवारपासून काही बसेस सुरू होतील. रस्त्याची अडचण असली तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही, असा विश्वास सुतवणे यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केला.