Home पब्लिक प्रॉब्लेम लोखंडी सळाखींनी टाके मारून शिवला जातोय राष्ट्रीय महामार्ग

लोखंडी सळाखींनी टाके मारून शिवला जातोय राष्ट्रीय महामार्ग

बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : गडचिरोली ते आष्टीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाची सिमेंट काँक्रिटने पुनर्बांधणी करून अवघे काही वर्ष होत नाही तोच या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगा वाढू नये यासाठी मार्गावर लोखंडी सळाखींनी टाके मारून रस्ता शिवण्याचे काम केले जात आहे. या प्रकारामुळे सदर महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गडचिरोली ते आष्टीपर्यंत सिमेंट काँक्रिटचा महामार्ग (क्र.सी 353) बांधण्यास 6 वर्षापूर्वी सुरूवात केली होती. अजूनही या मार्गावरील काही कामे पूर्ण व्हायची आहेत. या मार्गाच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण मार्गाचे काम पूर्ण व्हायच्या आतच पडलेल्या मोठ्या भेगांमुळे या मार्गाचा दर्जा किती सुमार होता याची पोलखोल झाली आहे.

वास्तविक सिमेंट काँक्रिटच्या अशा रस्त्याला किमान 25 ते 30 काहीच होत नाही. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता 5 वर्षही चांगल्या अवस्थेत राहिला नाही. आता या रस्त्यावर पडलेल्या भेगा वाढू नये म्हणून जीवंत माणसाच्या फाटलेल्या त्वचेला ज्याप्रमाणे टाके लावून शिवले जाते, त्याप्रमाणे लोखंडी सळाखींचे टाके मारले जात आहेत. गोविंदपूर या गावाजवळील हा प्रकार नागरिकांसाठी चर्चेचा विषय झाला आहे.

दर्जाहीन काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.