एसटी बसगाड्यांसाठी ताटकळतात विद्यार्थी, समस्या आगारप्रमुखांच्या दारी

अ.भा.विद्यार्थी परिषदेने दिले निवेदन

गडचिरोली : अलिकडे बसफेऱ्या वेळेत होत नसल्यामुळे किंवा फेऱ्याच रद्द होत असल्याने शाळेत जाणे-येणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळेत येण्यासाठी आणि घरी जाण्यासाठी उशिर होत असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन बसफेऱ्या पुरेशा प्रमाणात आणि वेळेत सोडा, अशी विनंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आगारप्रमुखांना निवेदन देऊन केली.

गडचिरोलीचे आगार प्रमुख राखडे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. रानखेडा मार्गावर बससेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय गडचिरोली-चामोशी मार्गावर विद्यार्थी थांबून असतात. या मार्गावर सर्वाधिक विद्यार्थीं शाळेत जाणे-येणे करतात. पण बस आधीच भरलेली असल्याने अनेक वेळा बस थांबतच नाही. विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्यामुळे अपघातही होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन वाढीव फेऱ्या देण्याची मागणी करण्यात आली.

याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक मार्गावर बसफेऱ्यांची कमतरता आहे. 10 दिवसात ही समस्या दूर न केल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा संयोजक अभिलाष कुनघाडकर, गडचिरोली नगर मंत्री विकास बोदलकर, संकेत मस्के, करण चौधरी आणि इतर विद्यार्थ्यांनी दिला.