गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्रीरोग विभागात दोन वेगवेगळ्या महिला रुग्णांवर अत्यंत आव्हानात्मक व उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून त्यांना नवा श्वास देण्यात आला. दुर्गम आणि मर्यादित सुविधा असतानाही दर्जेदार सेवा देण्यात विभागाने दाखवलेली क्षमता कौतुकास्पद ठरली आहे.
पहिल्या प्रकरणात, 46 वर्षीय महिला दीर्घकाळापासून गंभीर अतिस्राव या त्रासाने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेली होती. वारंवार अशक्तपणा, कमजोरी आणि दैनंदिन जगण्यावर परिणाम यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास खालावत होता. या परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी दुर्बिनद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद पुनर्वसन यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसऱ्या प्रकरणात, विभागासमोर आणखी मोठे आव्हान उभे राहिले. 22 आठवड्यांचे, आकाराने मोठे झालेले फायब्रॉइड गर्भाशय आणि त्यासोबत तीव्र अशक्तपणा असलेल्या रुग्णावर ‘एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी’ करणे हे धाडसी होते. शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल 1.8 किलो वजनाचा महाकाय फायब्रॉइड काढण्यात आला. जटिलता, रक्तस्रावाचा धोका आणि रुग्णाची एकूणच नाजूक प्रकृती लक्षात घेता हा संपूर्ण प्रयत्न अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयित आणि कुशलतेने पार पाडण्यात आला. रुग्णाची सुरक्षित अवस्था आणि यशस्वी परिणामामुळे कुटुंबीयांनीही मोठा दिलासा व्यक्त केला. दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
या यशस्वी शस्रक्रियांसाठी अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पेंदाम, डॉ.प्रसाद बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करणारे डॉ.प्रदीप बिस्वास आणि त्यांची समर्पित टीम यांनी तांत्रिक कौशल्य आणि समन्वय ठेवत मेहनत घेतली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आधुनिक, सुरक्षित आणि उच्च दर्जाची स्त्रीरोग शस्त्रक्रिया अगदी विश्वासाने व निश्चिंतपणे होऊ शकते हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले.
































