सूरजागड लोहप्रकल्पातील वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाचे निराकरण करा

शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अहेरी : आलापल्ली-आष्टी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 (C) वरून सुरजागड खाणीतील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील अनेक गांवे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील व या मार्गाने ये-जा करण्याऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आलापली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना अपघाताची भीती नेहमीच असते. त्यातच लोहखनीज वाहतूक करणारे वाहन रस्त्यात फसल्यानंतर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक ठप्प होते. यावर तोडगा काढून होणाऱ्या त्रासाचे निराकरण करावे, अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आविसंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

यासंदर्भात एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथील येथील डंपिंग यार्डला नियमाचे उल्लंघन करून मंजुरी देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी, अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ५० लाख रुपये व अपंगत्व आलेल्यांना १५ लाख रुपये तसेच जखमींना ५ लाख रूपयांची मदत द्यावी. आलापली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना बंदी घालावी. अहेरी ते आलापल्ली, अहेरी ते सुभाषनगर, अहेरी ते खमनचेरू आणि अहेरी ते आवलमरी या रस्त्यांच्या बांधकामांना मंजुरी देऊन सदर सर्व रस्त्यांचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे. या सर्व मुद्द्यांवर आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारासह नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात बोरी येथील मुख्य चौकात दि.११ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी मीणा यांनी दूरध्वनीद्वारे शिष्टमंडळास जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवले. तसेच सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवून बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात आविसंचे नंदू नरोटे, मोहन पुराम, सरपंच धनीराम हिडामी, सरपंच ललिना पुराम, राजपूर पॅच ग्रामपंचायतचे सुरेश गंगाधारीवार, मधुकर मडावी, कालीदास कुसनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.