आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तनुश्री आत्राम यांनी दिली भेट

आंदोलनातही माणुसकी जपली

आंदोलकांचे निवेदन स्वीकारताना तनुश्री आत्राम

अहेरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या 19 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी सदर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेत चर्चा केली.

दि.14/03/2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावेश करण्यासाठी शासननिर्णय निर्गमित झाला आहे. मात्र दिड वर्ष होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने, तसेच मानधनवाढ, लॅायल्टी बोनस, ईपीएफ, इन्शुरन्स, बदली धोरण मान्य होत नसल्याने, तसेच आरोग्य मंत्र्यांनी दि.8 व 10 जुलै 2025 रोजी संघटनेच्या शिष्टमंडळाला समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा समन्वयक जितेंद्र कोटगले यांच्या नेतृत्वात एकत्रिकरण समितीचे राजकुमार देवके, निलेश सुभेदार, वैशाली बोबाटे, मनोज गेडाम, राहुल कंकनालवार आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी

सदर कर्मचारी हे भरपावसात जिल्हा रुग्णालय परिसरात आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. अशातच 2 मूत्रपिंडाने आजारी आकस्मिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आले असल्याची बाब आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना माहिती होताच तात्काळ आंदोलनातील तंत्रज्ञ यांना पाठवून संबंधित रुग्णांना सेवा देण्यात आली. आंदोलनकर्ते कर्मचारी माणुसकीचे दर्शन घडवित करत असलेल्या या रुग्णसेवेबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.