वैरागड : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत कोजबी ग्रामपंचायतमध्ये पार पडलेली ग्रामसभा वादग्रस्त ठरली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 9 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील हॉलमध्ये ही सभा भरविण्यात आली. ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
ग्रामसभेला मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी पिण्याचे पाणी, नाली, रस्ते, वीज, तसेच सोनपूर व कोजबी येथील अतिक्रमण अशा विविध मूलभूत व ज्वलंत विषयांवर नागरिकांनी प्रश्न विचारले. मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही.
विशेष म्हणजे, अनेकवेळा ग्रामपंचायत प्रशासनाशी संबंध नसलेली त्रयस्थ व्यक्ती नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होती. तसेच ग्रामपंचायत अधिकारी हे शिपायाला बोलवून उत्तर विचारत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर संशयाचे धुके निर्माण होऊन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अतिक्रमणाच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला. याशिवाय ग्रामसभेत घेतले जाणारे ठराव केवळ कागदावरच मर्यादित राहात असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
सोनपूर येथील अतिक्रमणाबाबत नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर 28 दिवस आंदोलन करावे लागले होते. ग्राम पंचायत प्रशासन यांनी वारंवार आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करून प्रकरण नियमानुसार मार्गी काढू म्हणून शब्द दिला, परंतु जवळपास दोन वर्षाचा कालावधी संपत असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही व वेळकाढूपणा केला. याबाबत आमदार रामदास मसराम यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरमोरीचे गटविकास अधिकारी आरेवार यांनी आबादी जागेचे मोजमाप करून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने अजूनपर्यंत कार्यवाही केली नाही. ग्रामपंचायतीकडून या तक्रारींचे गांभीर्याने निराकरण करण्यात येईल की नाही, याकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.