गडचिरोली : जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसासोबतच गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील 20 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावरील पाल नदीच्या पुलावर पाणी आल्याने गडचिरोलीवरून नागपूर तथा उत्तरेकडील भागात मुख्य मार्गाने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील गडचिरोली ते चामोर्शीदरम्यान गोविंदपूर नाल्याच्या पुरामुळे दक्षिण भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान गोसीखुर्दचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याने ही स्थिती आज दिवसभर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना “घाबरू नका, पण सतर्क राहा” असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. नदीकाठच्या गावांमधील संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पंडा यांनी देसाईगंज, आरमोरी व गडचिरोली तालुक्यातील परिस्थितीचा आढावा व्हिडीओ कॅान्फरन्सिंगने घेतला. अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रसेनजीत प्रधान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नील तेलतुंबडे, तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी गडचिरोली, वडसा आणि आरमोरी तालुक्यातील नदीकाठच्या आणि शहरातील खोलगट भागात पोलीस, जिल्हा परिषद व महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे तसेच शासकीय निवारा केंद्र येथे सर्व स्थलांतरीतांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले. त्यांनी पुरप्रवण क्षेत्रात प्रत्येक तहसीलस्तरावर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवत संभाव्य पूरपरिस्थतीचा विचार करून बचाव व स्थलांतरणासाठी तात्काळ पावले उचलण्यास सांगितले. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.
पुलावरून पाणी वाहात असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. पोलीस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 353-सी (पाल नदी, गाढवी नदी)
2) देसाईगंज – अर्जुनी मोरगाव रस्ता, प्रमुख राज्यमार्ग-11 (तालुका देसाईगंज)
3) कुरखेडा-मालेवाडा रस्ता, राज्यमार्ग 362 ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
4) कोरची बोटेकसा-भीमपूर रस्ता, राज्यमार्ग 314 तालुका कोरची (भीमपूर नाला)
5) कुरखेडा-वैरागड रस्ता, राज्यमार्ग 377, तालुका कुरखेडा
6) वैरागड-कोरेगाव-धानोरा रस्ता, राज्यमार्ग 368, तालुका आरमोरी
7) मांगदा ते कलकुली, प्रजिमा 50
8) कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7, ता.कुरखेडा (लोकल नाला )
9) चातगाव-रांगी-पिसेवाडा रस्ता, प्रजिमा 36, तालुका आरमोरी
10) गोठनगडी-चांदागड-सोनसरी रस्ता, प्रजिमा 38, तालुका कुरखेडा
11) कुरखेडा-तळेगाव-चारभट्टी रस्ता, प्रजिमा 46, तालुका कुरखेडा
12) आंधळी-नैनपूर रस्ता, प्रजिमा 32 (सती नदी)
13) शंकरपूर-जोगीसाखरा-कोरेगाव चोप रस्ता, प्रजिमा 1, तालुका देसाईगंज
14) आष्टी-उसेगाव-कोकडी-तुळसी-कोरेगाव रस्ता, प्रजिमा 49, तालुका देसाईगंज
15) मालेवाडा-खोब्रामेंढा रस्ता, प्रजिमा 4, तालुका कुरखेडा
16) वैरागड-देलनवाडी रस्ता, प्रजिमा 8, तालुका आरमोरी
17) चौडमपल्ली-चपराळा रस्ता, प्रजिमा 53, तालुका चामोर्शी
18) सावरगाव-कोटगुल रस्ता, प्रजिमा 3, तालुका कोरची
19) अरसोडा-कोंढाळा-कुरूड-वडसा रस्ता, प्रजिमा 47, तालुका देसाईगंज
20) गडचिरोली ते चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग, (गोविंदपूर नाला)