आज दुपारनंतर पूरस्थिती निवळणार, अनेक मार्ग सुरू होण्याची शक्यता

गोसेखुर्दमधील पाण्याचा विसर्ग घटला

गडचिरोली : गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 10 पेक्षा जास्त मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद आहेत. त्यात गडचिरोली-आरमोरी, आरमोरी-ब्रह्मपुरी आणि गडचिरोली चामोर्शी या प्रमुख मार्गांचाही समावेश आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्याचा विसर्ग 3685 क्युमेक्सपर्यंत कमी केल्याने पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. आज (शुक्रवारी) दुपारनंतर अनेक मार्ग वाहतुकीसाठी मोकळे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भामरागड शहरालगत वाहणाऱ्या पर्लकोटाचाही पूर ओसरला आहे. त्यामुळे गावात शिरलेले पाणी ओसरले असून पर्लकोटाच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान देसाईगंजच्या हनुमान वॅार्डातील 41 लोकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी आश्रय देण्यात आला आहे. कोटगल बॅरेजमध्ये काम करणाऱ्या 110 लोकांनाही बाहेर काढण्यात आले आहे. या पुरामुळे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यावर मात करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन चमूंच्या तुकड्या कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गडचिरोली, भामरागड, सिरोंचा येथेही आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू आहेत.