एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम अशा घोटसूर ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच साधू कोरामी, ग्रा.पं.सदस्य हरिदास कावडे, लालू उसेंडी, सुनील नरोटे, सावजी कोवासे, साईनाथ चटारे, गंगाराम इष्टाम, रामचंद्र चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
घोटसूर ग्रामपंचायतअंतर्गत टिरकटोला, रेंगाटोला आणि कोत्ताकोंडा आदी गावांचा समावेश होतो. या भागात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेत धर्मरावबाबा आत्राम यांच्या आमदार निधीतून 5 लाखांचा सिमेंट रस्ता मंजूर केला. यावेळी त्यांनी परिसरातील विविध गावांना भेटी देत विकास कामांचे भूमिपूजन केले.
गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सिमेंट काँक्रिट रस्ता मंजूर केल्याने परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले. गावातील उर्वरित विविध समस्यांची माहिती घेत त्याही लवकरच सोडविण्याचे आश्वासन भाग्यश्री आत्राम यांनी दिले.