आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी नियतक्षेत्रात येणाऱ्या देऊळगाव लगतच्या जंगलात बुधवारी दुपारी मुक्ताबाई दिवाकर नेवारे (79 वर्ष) रा.देऊळगाव या महिलेवर वन्यप्राण्याने (वाघ किंवा बिबट्या) हल्ला करून तिला ठार केले. दरम्यान सरस्वताबाई झिगर वाघ (70 वर्ष) या महिलेचाही कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जंगलात आढळला. सरस्वताबाई दि.12 पासून बेपत्ता होती. तिचाही मृत्यू जंगली प्राण्याच्या हल्ल्यातच झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याबाबतची खात्री करण्यासाठी मृतदेहाची फॅारेन्सिक तपासणी करण्याचे काम गुरूवारी सुरू होते. त्याचा अहवाल आल्यानंतरच सरस्वताबाईच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मुक्ताबाई नेवारे यांच्या गळ्यावर प्राण्याच्या दातांचे व्रण असल्याने त्यांचा मृत्यू वाघ किंवा बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी (दि.20) वडसा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना 25 हजारांची सानुग्रह मदत दिली. उपवनसंरक्षक, सहायक वनरक्षक आणि आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सदर अधिकाऱ्यांनी त्या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करून गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या. त्या भागात वनकर्मचाऱ्यांमार्फत गस्त वाढविण्यात आली आहे. याशिवाय वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण बडोले यांनी कळविले.
बंदोबस्त करा, अन्यथा चक्काजाम आंदोलन
देऊळगाव, इंजेवारी, किटाळी, डोंगरसावंगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डाव्या पक्षांची वनविभागाला दिला आहे.
देऊळगाव येथील दोन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, अक्षय कोसनकर यांनी देऊळगाव येथे मृतांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वना केली.
यावेळी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात 8 ते 10 वाघ आणि बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण आणि भितीदायक झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा देऊळगाव येथे वनविभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष या डाव्या पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे.
































