गडचिरोली : जिल्ह्यात भात पिकाची रोवणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने खताचे वितरण व्हावे आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषि विभागाकडून जिल्ह्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात एक पूर्णवेळ गुणनियंत्रण निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आता महसूल मंडळनिहाय रासायनिक खतांचा पुरवठा केला जात आहे. खते मिळत नसल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना दक्षता घेणे आवश्यक आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खतांची खरेदी करावी. पावतीवरील संपूर्ण तपशील तपासून घ्यावा. विक्रेत्यांनी ज्यादा दर आकारल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात लेखी स्वरुपात तक्रार करावी.
जिल्ह्यामध्ये संतुलित खत पुरवठा करण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करत आहे. रॅक पॉइंटवर जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
अडचणीसाठी तक्रार नोंदवा
अनेकदा कृषी विक्रेत्यांकडून खतांची अनुपलब्धता किंवा पुरवठ्यात होणारा विलंब अशा समस्या समोर येत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत, कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खत न मिळाल्यास कायदेशीर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 8275690169 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही शेतकऱ्याला कृषी विक्रेत्यांकडून वेळेवर खते उपलब्ध झाली नाहीत किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल, तर त्यांनी तात्काळ याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करावी. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खतांच्या अनुपलब्धतेमुळे किंवा दिरंगाईमुळे आपल्या शेतीचे नुकसान होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.