गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या कोठरी अरण्यवासातील बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापन सोहळ्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली. भगवान गौतम बुद्धाचे दर्शन घेऊन बौद्ध समाजबांधवांसोबत चर्चा केली. भंते भगीरथ यांच्यासोबत विविध प्रलंबित विकास कामांवर यावेळी चर्चा केली. या ठिकाणी राज्य सरकारने विकास कामे मंजूर केली आहेत, परंतु अजूनपर्यंत ती कामे सुरू झालेली नाही, अशी खंत यावेळी खुणे यांनी व्यक्त केली.
निसर्गरम्य वातावरणात असलेले कोठरी येथील बुद्ध विहार प्रेक्षणीय आहे. या स्थळाचा आणखी विकास होणे गरजेचे आहे. येथे दरवर्षी आयोजित वर्षावास सोहळ्याला संपूर्ण राज्यातून हजारो बौद्ध समाज बांधव, उपासक, उपासिका तथा देशभरातील बौद्ध भिक्षुक भेट देतात. या ठिकाणी बौध्द बांधवांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने जत्रेचे स्वरूप येत असते.
यादरम्यान येथे आलेल्या उपासक-उपासिकांची आवश्यक ती व्यवस्था येथील भन्ते भगीरथ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते, पण ती अपुरी पडते. शासनाने या बौद्ध विहारास (क) वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी वीज पुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही. अनेक विकासात्मक कामे प्रलंबित आहेत. ती कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे खुणे म्हणाले.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.