चामोर्शी : तालुक्यातील लोकसंख्येने व विस्ताराने मोठ्या असलेल्या कुनघाडा (रै) येथील पाणीपुरवठा योजनेला पुन्हा ग्रहण लागले आहे. मुख्य जलकुंभातील विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आला आहे. ही योजना सोलरवर चालत असल्याने गावातील पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.
कुनघाडा (रै), तळोधी (मो) व नवेगाव (रै) या तीन गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गेल्या 30 ते 35 वर्षापासून ही पाणीपुरवठा योजना सुरू आहे. जवळच्या वैनगंगा नदीच्या पात्रातून पाईप लाईनद्वारे जलकुंभात पाण्याची साठवणूक केली जाते. नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल शुद्धीकरणाची सोयसुध्दा आहे. गावातील नागरिकांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळण्यासाठी तीनही गावात मोठ्या संख्येने खासगी नळ जोडण्या लावण्यात आल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाकडून खाजगी कंत्राटदारास दिले जाते. योजनेचे जुने कंत्राट रद्द होऊन गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून नवीन कंत्राटदारास हे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राट बदलानंतर परिस्थिती सुधारेल अशी नागरिकांना आशा होती, मात्र त्यात फारसा फरक पडलेला नाही.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 3 ते 4 दिवस पाणीपुरवठा बंद होता. 5 व 6 मार्च रोजी रोजंदारांचे मानधन थकल्याने पाणीपुरवठा बंद पडून गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. 23 मार्च रोजी मुख्य जलकुंभातील विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य जलकुंभातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले असून, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवेपर्यंत सोलरचा वापर करण्यात येत आहे. सोलर दीर्घकाळ टिकून राहात नसल्यामुळे टाकीत पाण्याची साठवणूक योग्य वेळी होत नाही. त्यामुळे एक-दोन दिवस आड म्हणजे अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती आहे.
































