नळ जोडणीनंतरही मरेगावात नळाला पाणीच नाही, गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष

सेनेच्या नेतृत्वात जि.प.वर दिली धडक

गडचिरोली : ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरकारने ‘जल जीवन मिशन योजना’ कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुध्द पाणी मिळावे ही मुळ संकल्पना आहे. परंतू गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि.प.क्षेत्रातील मरेगावात या योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. नळजोडणी करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा)चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (५ जानेवारी) जिल्हा परिषदेवर धडक दिली.

याप्रसंगी कात्रटवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन गावातील पाण्याची समस्या कथन केली. मरेगाव हे गडचिरोली तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असून गावाची लोकसंख्या १३०० पेक्षा अधिक आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी १० वर्षापुर्वी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. आता गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढल्याने प्रशासनाने गावात वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. परंतू ही वाढीव पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.

गावात ३५० नळजोडण्या आहेत. परंतू काही नागरिकांना अल्प पाणी मिळत आहे, तर काही नागरिकांच्या नळांना पाणीच येत नाही. उंच व सखल भागात समांतरीतरित्या पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. येत्या आठवडाभरात ही पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात यावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी दिला. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याशीही चर्चा करून त्यांना परिस्थिती कथन केली.

निवेदन देताना कात्रटवार यांच्यासह यादव लोहंबरे, संदीप भुरसे, संजय बोबाटे, सुरज उईके, संदीप आलबनकर, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, दिलीप वलादे, किशोर देशमुख, राहुल सोरते, दिलीप वलादे, धनंजय लडके, कैलास फुलझेले, उमाकांत हर्षे यांच्यासह अनेक शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.