गडचिरोली : जिल्ह्यातील शेतांमध्ये धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तींनी वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला होता. परंतू एक किलोमीटर पलिकडे जाऊन हे हत्ती पुन्हा माघारी फिरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. शेतातील उभे पीक फस्त करणाऱ्या या हत्तींमुळे सध्या गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे हे हत्ती गडचिरोलीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेल्या साखरा परिसरातील जंगलात आहेत.
दरम्यान हत्तींनी पोर्ला वनपरिक्षेत्रात फस्त केलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात कापणीवर येणारे धानपीक हत्तींनी उद्ध्वस्त केल्याने या नुकसानीची पुरेशी भरपाई शासन देणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. दररोज 8 ते 10 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान या हत्तींकडून केले जात असल्याची माहिती वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.