अहेरी : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील कुमरमभीम जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या एका नर हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हा हत्ती अहेरी तालुक्यातील वट्रा जंगलाच्या परिसरात दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, हत्तींच्या कळपातील एका नर हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात प्रवेश केला होता. कुमरमभीम जिल्ह्यातील दोन तालुक्यात मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या दोन दोन शेतकऱ्यांना दोन दिवसात त्याने ठार केले. या प्रकाराने तेलंगणा सरकारची यंत्रणा त्या हत्तीवर नजर ठेवून होती. दरम्यान प्राणहिता नदीकाठावरी जंगलातून त्या हत्तीने पुन्हा शुक्रवारी अहेरी तालुक्यातील वट्रा जंगलात प्रवेश केला.
टशर (नर हत्ती) हा खवळल्यास जास्त नुकसानकारक ठरतो. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण असून त्याच्यावर वनविभागाने नजर ठेवावी अशी मागणी केली जात आहे.