गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रमलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपासून आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी, आकापूर, इंजेवारी गावांच्या परिसरातील जंगलात ठाण मांडले आहे. रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर पडून ते गावालगतच्या शेतात शिरून उभे पीक फस्त करत आहेत. माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी शनिवारी पुन्हा एकदा या गावांचा दौरा करत शेतात जाऊन पाहणी केली. काही ठिकाणी मोठे वाहन जाणे शक्य नसल्याने त्यांनी गावातील दुचाकीवर स्वार होऊन शेतात पोहोचत प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांनी लागवड खर्च, येणारे उत्पन्न आणि नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून मिळणारी तोकडी मदत याचा हिशेब मांडला. त्यावर डॅा.नेते यांनी शासनाकडून मिळणारी मदत अपुरी आहे हे मान्य करत त्या रकमेत दुप्पटीने वाढ करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींच्या कळपात सुमारे 31 हत्ती आहेत. ते रात्री अंधार पडल्यानंतर शेतांमध्ये शिरतात. उन्हाळी धानासह मोठ्या प्रमाणावर असलेल्या मक्याच्या पीकाला हे हत्ती फस्त करतात. त्यातही ते वेगवेगळे छोटे कळप करून शेतात शिरत असल्यामुळे त्यांना नियंत्रित करताना वनविभागाच्या यंत्रणेची, हुल्ला टिमची चांगलीच कसरत होत आहे.
या दौऱ्यात भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपच्या विधी सेलचे अॅड.चाटे, सूर्यडोंगरीचे पोलीस पाटील विलास मेश्राम, विकास पायदलवार, शेतकरी रामचंद्र भोयर, धुरंधर सातपुते, गोवर्धन भोयर, महेश बांबोळे, परिसरातल्या गावातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.
अन् डॅा.अशोक नेते यांनी घेतला बाईकचा ताबा
या दौऱ्यात डॅा.नेते यांनी सूर्यडोंगरी, आकापूर, किटाडी, चुरमुरा, इंजेवारी या गावातील नुकसानीची पाहणी केली. काही भागातील शेताकडे कार जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भर उन्हात डॅा.अशोक नेते यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत गावातील बाईक मागविली आणि त्यावर स्वार होऊन बाईक शेताच्या दिशेने वळविली. तेथून शेतातील पीकांपर्यंत पायी जाऊन पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. काही ठिकाणी पाण्याची पाईपलाईनसुद्धा हत्तींनी तोडली होती. या नुकसानीच्या भरपाईची रक्कम वाढवून देण्यासाठी मी वरिष्ठ पातळीवर विषय मांडतोच, मात्र पंचनामे व्यवस्थित करा, अशी सूचना यावेळी डॉ.नेते यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना केली.
रखवाली सोडून हुल्ला टिमचे सदस्य झोपतात !
या दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून नागरिकांना सावध करण्यासाठी नियुक्त केलेल्या पश्चिम बंगालमधील हुल्ला टिमवर नाराजी व्यक्त केली. या टिमचे लोक रात्री थोडा वेळ जागतात, नंतर गावातील शाळेत येऊन झोपतात, अशी तक्रार गावातील नागरिकांनी केली. यासंदर्भात काही नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांच्यावर आमचे नियंत्रण नाही, असे सांगत वनविभागाचे कर्मचारी हात वर करत आहेत. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.