देसाईगंज : गेल्या तीन महिन्यांपासून आरमोरी, गडचिरोली तालुक्यात फिरणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा देसाईगंज तालुक्यात एंट्री घेतली आहे. तालुक्यातील विहिरगाव, पिंपळगाव गावालगतच्या क्षेत्रात हे हत्ती नजरेस पडल्याने त्या भागातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्रातील गावांलगत फिरत होता. अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकावर या हत्तींची ताव मारला. आता शेतातील उभे पीक संपल्यानंतर हत्तींनी देसाईगंज तालुक्याकडे मोर्चा वळवला. याशिवाय दोन टस्कर (नर) हत्ती वैरागड परिसरातही दिसून आले. हत्तींमुळे शेतातील भाजीपाला पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे.
विशेष म्हणजे नुकसानभरपाईच्या निकषात बदल करून वाढीव मदत देण्याची सरकारची सध्या मानसिकता नाही. त्यामुळे हे हत्तीसंकट कधी आणि कसे दूर होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.