200 कोटी खर्च करून तयार होणार चामोर्शी ते हरणघाट मार्ग

खड्डेमय रस्त्याचे दिवस पालटणार

रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे

चामोर्शी : जिल्ह्यात आलापल्ली ते सिरोंचा हा मार्ग सर्वाधिक कुप्रसिद्ध झालेला असताना चामोर्शी ते मूल मार्गावरील हरणघाटपर्यंतचा मार्गही त्याच पद्धतीने कुप्रसिद्ध होत होता. अनेक वर्षांपासून या मार्गावर वारंवार खड्डे पडत असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्याचे दिवस पालटणार आहे. तब्बल 200 कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे.

हा रस्ता अनेक वेळा दुरूस्त करूनही त्यावर वारंवार खड्डे पडत होते. त्यामागील कारण स्पष्ट करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता धिरज बड्डे यांनी सांगितले की, एकतर या मार्गाची क्षमता नसताना त्यावरून जड वाहतूक सुरू होती. दुसरे कारण म्हणजे हा रस्ता जमिनीशी समतल असल्यामुळे शेतातून वाहात येणारे मातीमिश्रीत पाणी या मार्गावर जमून हा रस्ता खराब होत होता. अशा स्थितीत रस्त्याची डागडुजी करण्याऐवजी त्याची पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने तात्पुरती डागडुजी करण्याशिवाय इलाज नव्हता. आता मात्र राज्य शासनाने 200 कोटी रुपये मंजूर केल्याने हा रस्ता मजबूत स्वरूपाचा आणि सिमेंटचा बनविला जाणार आहे. त्यासाठी कामाला सुरूवातही झाल्याचे अभियंता बड्डे यांनी सांगितले.

हे काम पूर्ण करण्याची मर्यादा दोन वर्षांची आहे, मात्र पुढच्या वर्षी मार्च 2027 पर्यंतच हे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही सा.बां.विभागाकडून सांगण्यात आले.