मार्कंडा मंदिर परिसरात लवकरच नऊ कोटींच्या कामांना सुरूवात

जिर्णोद्धाराला गती द्या– ॲड.जयस्वाल

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी शुक्रवारी मार्कंडा देवस्थान येथे भेट देऊन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाला अधिक कामगार नियुक्त करून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंदिर परिसरात नऊ कोटी रुपयांच्या विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आमदार डॉ.मिलिंद नरोटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यमंत्री जयस्वाल यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिक व भाविकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मार्कंडा मंदिर हे प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत यादव, पुरातत्त्व विभागाचे शुभम कोरे, एमएसआरडीसीचे जाधव, तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, तसेच महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.