गडचिरोली : आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड इत्यादी तालुक्यांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर रुग्णांचा मोठ्या प्रमाणात ताण आहे. पण त्यांना योग्य सेवा मिळण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॅाक्टरांचे मनुष्यबळ नाही. या समस्या तातडीने सोडवा, अन्यथा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल, असा ईशारा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, जिल्हाध्यक्ष नितेश राठोड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिला.
वरील पदाधिकाऱ्यांशिवाय नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, नंदू वाईलकर, काँग्रेसचे जिल्हा महासचिव नदीम नाथानी, जितू पाटील मुनघाटे, अभिजीत धाईत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, अनिकेत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
दररोज होणाऱ्या अपघातांमुळे गंभीर जखमी रुग्ण रुग्णालयात येतात, पण तज्ज्ञ डॅाक्टर नसल्यामुळे रुग्णांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी 108 क्रमांकावरून येणाऱ्या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे गंभीर रुग्णांच्या रेफर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी काही प्रसंगी रुग्णांचा उपचारादरम्यान अथवा प्रवासातच मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात 102 व 108 क्रमांकाच्या एकूण 55 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी केवळ 10 रुग्णवाहिका या 108 क्रमांकाच्या आहेत. यामधील दोन रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी व एक रुग्णवाहिका महिला व बाल रुग्णालयासाठी राखीव आहे. उर्वरित सात रुग्णवाहिका तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्ये रुग्ण रेफरसाठी वापरण्यात येतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका क्वचितच उपलब्ध होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात, राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असूनसुद्धा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसून येते. रुग्णवाहिकांची कमतरता व इतर आरोग्यविषयक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात तातडीने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात यावी व आरोग्य सेवेशी संबंधित सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी हे निवेदन स्वीकारले.
































