देसाईगंज : तालुक्यातील आरमोरी मार्गावरच्या कोंढाळा गावात पोलीस भरती, सैनिक भरती, तलाठी, ग्रामसेवक व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडूलकर यांनी पुस्तके भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केले.

तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावच्या सरपंच अपर्णा राऊत यांनी तहसीलदार डुडूलकर यांची भेट घेतली. त्यांची गरज लक्षात घेऊन तहसीलदार डुडूलकर यांनी या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके भेट देत त्या पुस्तकांचे दररोज वाचन करा, प्रसार माध्यमातील दररोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवा, तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आपले ध्येय निश्चित करा, असे सांगत वेळोवेळी तुम्हाला मी मदत करण्यास तयार आहे, अशी ग्वाही दिली. काही मुले मुंबई-पुणे येथे जाऊन क्लासेस लावून अभ्यासाची तयारी करत असतात, पण आपण गावात राहूनही अभ्यास करून आपले ध्येय पूर्ण करू शकतो, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आम्हा युवकांना मिळालेल्या पुस्तकांमुळे आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल, असे मत या तरुणांनी व्यक्त केले.


































