झाडे समाजाच्या नोंदणीतील चुकांची सजा बेरोजगार युवकांना का?

समाजबांधवांनी उपस्थित केला सवाल

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात वास्तव्य असलेला झाडे समाज हा एनटी-सी या प्रवर्गात मोडतो. त्याबाबतचे जात पडताळणी प्रमाणपत्रही अनेक जणांकडे आहे. मात्र 1990 पूर्वीच्या सूचीत या जातीचा उल्लेखच नसल्यामुळे नोंदणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी झाडे कुणबी अशी नोंद केली. पण त्या तांत्रिक चुकीची सजा आज या समाजातील बेरोजगारांना देऊ नका, त्यांना एनटीसी या प्रवर्गातूनच रोजगाराचा हक्क द्या, अशी विनंती झाडे समाजबांधवांनी येथे पत्रकार परिषद घेऊन केली.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा आणि अहेरी तालुक्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मिळून 64 गावांत झाडे जातीमधील लोक स्वातंत्र्यापूर्वीपासून वास्तव्यास आहेत. तत्कालीन अधिकारी-कर्मचारी आणि समाजातील पूर्वजांच्या अशिक्षितपणामुळे राजस्व अभिलेखात झाडे कुणबी, झाड्या कुणबी व कुणबी अशा चुकीच्या नोंदी झाल्या आहेत. 1990 मध्ये तयार केलेल्या जातीच्या सूचीमध्ये झाडे ही स्वतंत्र जात असल्याचे नमूद करण्यात आले. त्यापूर्वी सूचित नाव नसल्यामुळे पूर्वजांनी झाडे अशी जात सांगितली तरी नोंदणी करणाऱ्यांनी झाडे कुणबी अशी नोंद केली.

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती 2022-23 मध्ये झाडे जातीच्या 26 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यांना 2 सप्टेंबर 2024 रोजी वैद्यकीय तपासणीसाठी येण्याचा मॅसेज पोलीस विभागाकडून आला. पण लगेच येऊ नका असा मॅसेज पाठविण्यात आला. पोलीस प्रशासनाने राजकीय दबावात येऊ झाडे समाजावर अन्याय करू नये अशी मागणी करण्यात आली.

विशेष म्हणजे 12 डिसेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा भरतीमध्ये उमेदवारांची निवड मागास प्रवर्गासाठी आरक्षित जागेवर झाल्यास त्यांना जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधिन राहून तात्पुरती नियुक्ती द्यावी, असा उल्लेख आहे. असे असताना पोलीस प्रशासनाने झाडे समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी समाजबांधवांनी केली.

पत्रपरिषदेला अनिल मंटकवार, रमेश तुनकलवार, बंडूजी चौधरी, मारोती सोदुरवार, वासुदेव तुनकलवार, कमलाकर कोमलवार, राकेश गरकुलवार, राजेश्वर बंडावार असे अनेक समाजबांधव उपस्थित होते.