Home क्राईम 11 माओवाद्यांनी सोडले शस्र, सव्वा वर्षात 123 जण शरण

11 माओवाद्यांनी सोडले शस्र, सव्वा वर्षात 123 जण शरण

आता उरले केवळ 6 माओवादी !

गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (दि.19) 5 वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण 11 माओवाद्यांनी शस्रत्याग करत पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यांच्यावर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत, म्हणजे सव्वा वर्षात 123 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली आहे. पोलिसांच्या रेकॅार्डनुसार आता जिल्ह्यात केवळ 6 माओवादी शिल्लक राहिले आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत ते सर्वजण शरण येतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. (अधिक बातमी खाली वाचा)

कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या छत्तीसगडकडील सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून गेल्या 20 वर्षात 794 माओवाद्यांनी चळवळीचा त्याग करून सामान्य जीवन जगणे पसंत केले आहे. त्यात अनेक वरिष्ठ आणि जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाकडून पुनर्वसन घडवून आणले जात असल्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षात आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

गुरूवारी आत्मसमर्पण करणाऱ्या 11 जणांमध्ये सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम), बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (एरीया कमिटी सचिव – इंद्रावती एरीया कमिटी), सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर- पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पिपीसीएम – पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), मिनको ऊर्फ जमनी का­या मट्टामी (सदस्य – कंपनी क्र.10), सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य – सँड्रा दलम), रमेश पांडू मडावी (सदस्य – मोबाईल पोलिटीकल स्कुल), किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीय कमांडर – सँड्रा दलम) अशा छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या 8 जणांसह गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम – भामरागड दलम), रा.गुड्डीगुडम, ता.अहेरी, गणेश उलगे कोवासी (सदस्य – कंपनी क्र.10), रा.हिक्केर, ता.एटापल्ली आणि धनु दसरु वेळंजे (सदस्य – कंपनी क्र.10), रा.ताडगाव, ता.भामरागड यांचा समावेश आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

भुपतीच्या आत्मसमर्पणानंतर उतरती कळा
15 ऑक्टोबर 2025 रोजी पोलिट ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच केंद्रीय रिजनल ब्युरोचा सचिव मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोलीसह संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीला उतरती कळा लागली. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 897 माओवादी सदस्यांनी 545 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे हे विशेष. (अधिक बातमी खाली वाचा)

आत्मसमर्पितांवर असे होते शासनाचे बक्षीस
गुरूवारी आत्मसमर्पण करणाऱ्या सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी आणि बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी या दोघींवर प्रत्येकी 16 लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. तसेच सुखलाल बोळगा कोक्सा आणि शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी या दोघांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. यमुनक्का रुखमाक्का पोट्टी पेंदाम हिच्यावर 6 लाख, गणेश उलगे कोवासी आणि मिनको ऊर्फ जमनी का­या मट्टामी यांच्यावर प्रत्येकी 4 लाख रुपयांचे बक्षीस होते. उर्वरित सर्वांवर प्रत्येकी 2 लाखांचे बक्षीस होते. (अधिक बातमी खाली वाचा)

या आत्मसमर्पणाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आदी अधिकारीगण उपस्थित होते.