गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुडकेलीच्या जंगलात बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात दारू तस्कर धर्मा रॅायसह 11 आरोपींना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत चार दिवसांपूर्वी 39 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणात सुरूवातीला धुळे जिल्ह्यातील चार लोकांना अटक करण्यात आली होती, तर धर्मा रायसह इतर काही आरोपी पळून गेले होते. धर्मा रॅाय आणि त्याचा सहकारी शुभम बिश्वास हे रात्रीतून नागपूरला पळाल्याचे समजताच नागपूर पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील 9 कामगारांना वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.