आचारसंहितेच्या काळात दारूबंदीसह 487 प्रकरणांत 411 गुन्हे दाखल

कर्तव्यात कसूर, 6 कर्मचाऱ्यांवर कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून दारूबंदीसह इतर 487 प्रकरणांत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थिर व निगराणी पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये एकूण 411 गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय निवडणूकविषयक जबाबदारी दिली असताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात 5, तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तीनही विधानसभा क्षेत्रात आदर्श आचारसहिंतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना अवैधरीत्या दारु विक्री, वाटप करणे, रक्कम बाळगणे, मतदारांना वस्तुच्या स्वरुपात प्रलोभनिय साहित्य वाटप करणे इत्यादी गैरप्रकारांना रोखण्यासाठी विविध पथकं सज्ज आहेत.

आरमोरी विधानसभा क्षेत्रात स्थिर व फिरते निगराणी पथकाकडून अंदाजे 219 लीटर दारू व इतर साहित्य मिळून 2,88,289 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात स्थिर व फिरते निगराणी पथक यांचेकडून अंदाजे 131 लीटर दारु व इतर साहित्य मिळून 4,23,345 चा मुद्देमाल जप्त केला. अहेरी क्षेत्रात स्थिर व फिरत्या निगराणी पथकाकडून रोख 7,50,000 रुपये आणि व अंदाजे 399 लीटर दारु आणि इतर साहित्य (वाहन, लाकडी डोंगा, घडयाळ व साडया इत्यादी) असा एकूण 14,15,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.