62 लाखांचे इनाम असलेल्या 6 जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

'विकासातूनच माओवादाचे उच्चाटन'

भारतीय संविधानाचे पुस्तक देऊन आत्मसमर्पण करणाऱ्यांचे स्वागत करताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व इतर अधिकारीगण

गडचिरोली : माओवाद्यांच्या डिव्हिजनल कमिटी मेंबर असलेल्या दाम्पत्यासह एक कमांडर, दोन पीपीसीएम आणि एक एसीएम पदावरील 6 जहाल माओवाद्यांनी बुधवारी (दि.24) पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण 62 लाख रुपयांचे इनाम होते. यातील काही गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले तर काही छत्तीसगमध्ये कार्यरत असणारे माओवादी आहेत. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या प्रयत्नांमुळे 2025 मध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची संख्या 40 झाली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मार्च 2026 पर्यंत माओवादाचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. पोलिसांनी निर्माण केलेल्या सुरक्षित वातावरणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात अनेक उद्योग समुह येत आहेत. गडचिरोली स्टिल हब म्हणून विकसित होत असल्याने आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या आर्थिक विकासामुळे माओवाद संपण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

यावेळी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सीआरपीएफचे उप-कमांडंट (इंटेलिजन्स) सुमित वर्मा, सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, सी-60 पथकातील जवान उपस्थित होते.

यावेळी नक्षलविरोधी अभियानात चकमकीसह उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांचा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चकमकीत विशेष कामगिरी करणाऱ्यांना रिवॅार्डही देण्यात आले. तसेच नक्षलपिडीत कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पोलीस महासंचालक, अपर महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवनिर्मित कवंडे पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस जवानांसोबत संवाद साधला.

असे आहेत आत्मसमर्पित माओवादी

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन, मास टिम) हा मूळचा अहेरी तालुक्यातील करंचा गावचा रहिवासी आहे. विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज) ही मूळची अहेरी तालुक्यातील मांड्रा गावाची रहिवासी आहे. कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम) ही रा.पडतानपल्ली, ता.भामरागड, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र.10) रा.पामरा, ता.भैरामगड, जि.बिजापूर (छ.ग.), समीर आयतू पोटाम (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्निकल टिम) रा.पुसणार, ता.गंगालूर, जि.बिजापूर (छ.ग.), आणि नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी (एसीएम, अहेरी दलम), रा.नैनेर, ता.अहेरी यांचा समावेश आहे. या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.