सण-उत्सवकाळात शांततेसाठी जिल्ह्यातील 77 गुन्हेगार हद्दपार

सर्वाधिक 19 जण आरमोरीतील

गडचिरोली : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा, यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. त्याअंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 163 (2) अन्वये कायदा व सुव्यवस्था भंग करण्याची शक्यता असलेल्या 77 सराईत गुन्हेगारांना गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

यामध्ये पोस्टे कुरखेडा 5, वडसा 11, कोरची 03, गडचिरोली 9, आरमोरी 19, चामोर्शी 4, अहेरी 11, मुलचेरा 5, आष्टी 9 व उपपोस्टे रेपनपल्ली 1 अशा प्रकारे विविध पोस्टे व उपपोस्टे हद्दीतील एकूण 77 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर यापूर्वीही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच समाजातील शांतता भंग करणारी कृत्ये इ.प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेस बाधा निर्माण होऊ नये या दृष्टीने सदर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई नागरिकांना सुरक्षित व शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्रातील सर्व नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द राखून उत्सव साजरा करावा, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.